
पंचायत समिती कार्यालय, शिरूर (का.) येथे आढावा बैठक
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी पंचायत समिती कार्यालय, शिरूर (का.) येथे गटविकास अधिकारी श्री. भारत नागरे यांच्या उपस्थितीत आष्टी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत कामांचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीत वैयक्तिक स्वरूपातील जलसिंचन विहिरी, शेततळे, घरकुल, गायगोठा, शेळीशेड तसेच सार्वजनिक स्वरूपातील शेतपाणंद रस्ते, वस्ती रस्ते, खडीकरण आदी कामांना मोठ्या प्रमाणात मंजुरी मिळालेली असतानाही नरेगा आयुक्तांनी घातलेल्या काही निर्बंधांमुळे कामांची अंमलबजावणी अडचणीत येत असल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर रोजगार सेवक व द्वितीय रोजगार सेवक यांच्या माध्यमातून विहिरी व शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असली, तरी अद्याप मस्टर व बिले न निघाल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आमदार सुरेश धस यांनीया सर्व बाबींवर सखोल चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेऊन मार्च २०२६ पूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य मार्ग काढणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद केले. त्यासाठी प्रशासनाने समन्वयाने व तत्परतेने कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
या आढावा बैठकीस सर्व सरपंच, रोजगार सेवक, पंचायत समिती कर्मचारी तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis