महापालिका निवडणुकांतही काँग्रेसचा झंझावात दिसेल - हर्षवर्धन सपकाळ
नागपूर/ मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २८८ नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगला कौल मिळाला असून ४१ नगराध्यक्षांसह १००६ नगरसेवक विजयी झाले आहेत. नगरसेवकांच्या २ हजार जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. नगरपालिका निवडणुकीतील
महापालिका निवडणुकांतही काँग्रेसचा झंझावात दिसेल - हर्षवर्धन सपकाळ


नागपूर/ मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २८८ नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगला कौल मिळाला असून ४१ नगराध्यक्षांसह १००६ नगरसेवक विजयी झाले आहेत. नगरसेवकांच्या २ हजार जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. नगरपालिका निवडणुकीतील हा झंझावात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसेल असा विश्वास व्यक्त करत लोकशाहीविरोधी भाजपा महायुतीच्या हुकूमशाही व ठोकशाहीला जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, निवडणूका निष्पक्ष, पारदर्शी, करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण निवडणूक आयोगाची भूमिका पाहता त्यांनी विश्वासार्हतेला हरताळ फासला आहे. वोटचोरीचा मुद्दा काँग्रेस पक्षाने उचलून धरला, शेवटी मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत, हे त्यांना मान्य करावे लागले पण पुढे त्यात काही सुधारणा झालेली दिसत नाही. निवडणूक आयोगाचे काम पाहता ते सत्ताधारी पक्षाच्या सांगण्याने काम करत आहेत हे दिसते. मतदार याद्यात घोळ, मतदान प्रक्रियेसाठी तारीख पे तारीख, अर्ज भरून घेताना विरोधकांची अडवणूक व सत्ताधाऱ्यांना मोकळीक दिली. रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्यास मुभा दिली आहे, म्हणजे एकीकडे पैसा वाटा आणि मतदान केंद्राकडे दुर्लक्ष असा हा प्रकार आहे. आम्ही सुधारणार नाही अशीच भूमिका निवडणूक आयोगाची दिसत आहे. निवडणूक आयोग, प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुटवले असून नंगानाच सुरु आहे.

*बिनविरोधसाठी सत्ताधारी पक्षाचा तमाशा...*

नगरपालिका व आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा व मित्रपक्षांनी साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर केला असून त्यांच्या मदतीला पोलीस, मंत्री, त्यांचे पीए तर आहेतच पण निवडणूक आयोगही त्यांना मदत करत आहे. यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भर पडली आहे. नार्वेकर यांनी त्यांचे भाऊ, बहिण व वहिनी यांना बिनविरोध करण्यासाठी अत्यंत असभ्य वर्तन केले आहे, गुंडगिरी केली, विरोधकांना दमदाटी केली, त्याचे सीसीटीव्हीचे फुटेज प्रशासनाने गायब केले. सर्वबाजूने तक्रार झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिले पण त्यातून नार्वेकर यांच्यावर कसलीच कारवाई केलेली नाही. बिनविरोध निवडणुकीच्या बाबतीत काँग्रेस पक्षाने आपली भुमिका स्पष्ट केलेली असून जेथे बिनविरोध झाले तेथे नोटाचा पर्याय ठेवा अशी मागणी आहे आणि न्यायालयात जाण्याबाबत कायदेतज्ञांशी विचारविमर्श करू असे सपकाळ म्हणाले.

*भाजपाला सर्वांच्याच आठवणी पुसायच्या आहेत..*

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, विलासराव देशमुख यांचे व्यक्तीमत्व व योगदान हे मोठे व निर्विवाद आहे. भाजपा, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस व रविंद्र चव्हाण यांना सत्तेचा प्रचंड अहंकार आहे. मोदी स्वतः ईश्वर असल्यासारखे वागतात व त्यांचे चेलेचपाटे हे असभ्य, विकृत विधान करत असतात, काँग्रेस पक्ष या विधानाचा निषेध करतो. पण भाजपाची मानसिकता पाहता फक्त विलासराव देशमुख यांच्याच आठवणी त्यांना पुसायच्या नाहीत तर अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे योगदानही त्यांना पुसून टाकायचे आहे. त्यांना फक्त मोदी व शाह ही दोनच नावे ठेवायची असून रेशीमबागेतील हेडगेवार व गोलवलकर यांचे फोटे काढून मोदी शाह यांचेच फोटो त्यांना लावायचे आहेत.

*देवाभाऊ नाही तर टक्काभाऊ..*

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील गावात एका शेतात ड्रग्जचा मोठा कारखाना सापडला, मुंबई क्राईम बँचने कारवाई करत ४० कामगारांना ताब्यात घेतले पण एकनाथ शिंदे यांचा खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी हस्तक्षेप करून त्या कामगारांना सोडण्यास भाग पाडले. या ड्रग्ज प्रकरणावरून रेहमान डकैत कोण हे स्पष्ट झाले आहे. एवढा मोठा ड्रग्ज कारखाना सापडूनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना क्लिन चिट देऊन टाकली. सत्ताधारी कंत्राटातून टक्केवारी खातातच आता ड्रग्जमधूनही पैसे कमावू लागले आहेत. फडणवीस हे देवाभाऊ नाही तर टक्काभाऊ आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

*भाजपाचे आशिष शेलार यांच्या बद्दल* बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सावरकर जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी काय केले, भारत छोडो आंदोलनाला सावरकरांचा विरोध होता. गाय ही उपयुक्त पशू आहे असे सावरकर म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दलचे सावरकरांचे विचार काय आहेत, संविधानाला त्यांचा विरोध होता, माफीनाम्यातील त्यांचा विचार याबद्दल शेलार बोलत आहेत का, त्याचा खुलासा करावा आणि सावरकर ६० रुपये पेन्शन घेत होते, ते मान्य आहे का? हे आशिष शेलारांना स्पष्ट करावे. शेलार यांच्याशी या विषयावर खुली चर्चा करण्यास काँग्रेस तयार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande