
रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ (अ) मधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शंकर मारुती वायदंडे यांच्या प्रचाराला उत्साहात सुरुवात झाली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या महामानवांना अभिवादन करून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.
प्रचाराचा नारळ वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, महासचिव अविनाश अडगळे व महासचिव संतोष मुजमुले यांच्या शुभहस्ते फोडण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व पैठणीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक महिलांनी आनंदाने सहभाग घेतला.
यावेळी बोलताना शंकर वायदंडे यांनी प्रभाग क्रमांक १७ चा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. “प्रभागातील मूलभूत प्रश्न, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य यांसह झोपडपट्टी वसाहतींचे पुनर्वसन हे माझे प्रमुख ध्येय आहे. प्रभाग १७ झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. मागील नगरसेवक व सत्ताधारी पक्षांनी झोपडपट्टी पुनर्वसनाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रश्न रखडल्याचा आरोपही त्यांनी केला.
“जनतेचा आवाज पालिकेच्या सभागृहात पोहोचवण्यासाठी गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे आवाहनही त्यांनी केले. आतापर्यंत प्रस्थापित पक्षांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या प्रभागात ‘आयात’ उमेदवार दिल्याचा आरोप करत, पंचशीलनगर झोपडपट्टीतील स्थानिक, तळागाळातील उमेदवार म्हणून शंकर वायदंडे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके