
जळगाव, 06 जानेवारी (हिं.स.) | जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी महापालिकेकडून नियुक्त २ हजार ८११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.
हे प्रशिक्षण दोन सत्रांत पार पडले असून, निवडणूक साहित्य वाटपापासून मतदान प्रक्रिया, साहित्य जमा करणे तसेच मतमोजणीच्या दिवसापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. दरम्यान, या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या ९९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निवडणूक कामकाजात दिरंगाई अथवा दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
महापालिकेतर्फे शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात निवडणूक प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी व निवृत्ती गायकवाड यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, नियमावली, आचारसंहिता तसेच संभाव्य अडचणींवर कसे मात करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास महापालिकेच्या उपआयुक्त निर्मला गायकवाड, उपआयुक्त पंकज गोसावी यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, जितेंद्र कुवर, महेश चौधरी, मंजुषा घाटगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश कोळी, ज्योती वसावे, प्रसाद पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका महत्त्वाची असून, सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर