रायगड : ई-मार्केटिंगच्या माध्यमातून महिला बचतगटांचे सक्षमीकरण
रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषद, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व प्रायमूव्ह, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचतगट सदस्यांसाठी ‘क्षमता बांधणी’ या विषयावर एकदिवसीय कार्य
ई-मार्केटिंगच्या माध्यमातून महिला बचतगटांचे सक्षमीकरण


रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषद, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व प्रायमूव्ह, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचतगट सदस्यांसाठी ‘क्षमता बांधणी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा सोमवारी (ता. ५) रोहा पंचायत समिती सभागृहात उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

ई-मार्केट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता यावीत, या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून एकूण ४५ महिला बचतगट सदस्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. कार्यशाळेस जिल्हा व्यवस्थापक (मार्केटिंग) सिद्धेश राऊळ, डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ सागर सावंत (प्रायमूव्ह, पुणे), विभागीय समन्वयक विक्रांत सोहनी (कोकण विभाग) आणि प्रभाग समन्वयक मिताली तांडेल (रोहा) उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची पाहणी करण्यात आली. तसेच ई-मार्केट प्लॅटफॉर्मसाठी आवश्यक असलेल्या ऑनबोर्डिंग प्रक्रियेबाबत नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले. डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट सागर सावंत यांनी लेबलिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि ऑनबोर्डिंग प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन केले. विभागीय समन्वयक विक्रांत सोहनी यांनी ‘उमेद मार्ट’ अॅपचे महत्त्व, वापर पद्धती आणि किंमत निर्धारणाबाबत माहिती दिली. जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ यांनी उत्पादन विकास, गुणवत्ता आणि जिल्हा मार्ट संकल्पनेवर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेदरम्यान पनवेल येथील यशस्वी महिला उद्योजिका विद्या बागवे यांनी आपले अनुभव कथन करून उपस्थित महिलांना प्रेरणा दिली. या प्रशिक्षणामुळे महिला बचतगटांच्या उत्पादनांना डिजिटल माध्यमातून बाजारपेठ मिळणार असून, ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande