
जळगाव, 06 जानेवारी (हिं.स.) | जळगाव शहर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून उमेदवारांचा प्रचाराला वेग आला आहे. मात्र अद्याप महापौर पदाचे आरक्षण राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावेळी कोणत्या प्रवर्गाचा महापौर होणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
साधारणपणे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी किंवा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान महापौर पदाचे आरक्षण (उदा. महिला, अनुसूचित जाती, ओबीसी किंवा खुला प्रवर्ग) निश्चित केले जाते. यामुळे राजकीय पक्षांना आपली रणनीती ठरवणे आणि त्या-त्या प्रवर्गातील सक्षम उमेदवारांना बळ देणे सोपे जाते. मात्र, यंदा आरक्षणच निश्चित नसल्याने महापौरपदासाठी तयारी करणारे राजकीय नेते संभ्रमात सापडले आहेत. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.रिंगणात उतरलेल्या सर्वच इच्छुकांचे आणि दिग्गज नेत्यांचे लक्ष आता राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे लागले आहे. आरक्षण काय निघते, यावरच अनेक गणिते अवलंबून आहेत. या आठवड्यात आरक्षण निघेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आरक्षण जाहीर न झाल्यामुळे राजकीय पक्षांना आपला महापौरपदाचा चेहरासमोर आणता येत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर