
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)माजलगावची पत्रकारिता म्हणजे निःपक्षपाती असल्याचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आज केला. मराठी पत्रकारितेचे जनक कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या दर्पण दिनाचे औचित्य साधून माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दर्पण पुरस्कार, माजलगाव भूषण पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार व यशस्वी उद्योग पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
आमदार प्रकाश सोळंके म्हणाले,कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ साली सुरू केलेले ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र केवळ बातम्यांचे माध्यम नव्हते, तर समाजप्रबोधन, सत्यनिष्ठा, निर्भीड लेखन व सामाजिक जागृतीचे प्रभावी साधन होते. इंग्रजी सत्ताकाळातही त्यांनी विवेकवादी विचार, विज्ञाननिष्ठा आणि समाजसुधारणेचा पाया पत्रकारितेमधून घातला. त्यामुळेच त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून गौरवले जाते.त्यांच्या विचारांचा वारसा जपत आजच्या काळातही समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
श्री.सुधाकर देशमुख (दर्पण पुरस्कार) , मा.आ.बाजीरावजी जगताप (माजलगाव भूषण पुरस्कार), सौ.मंगला सोळंके ( समाज भूषण पुरस्कार) मा.नगराध्यक्षा शिफा बिलाल चाऊस ( सत्कारमूर्ती ), श्री.शेख अब्दुल सत्तार ( उद्योग भूषण पुरस्कार) या सर्वांना सन्मानित करण्यात आले.पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन. हीच परंपरा पुढे नेत पत्रकारिता आणि समाजकार्य अधिक भक्कम होवो, हीच अपेक्षा असल्याचे आमदार सोळंके म्हणाले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis