
नांदेड, 6 जानेवारी, (हिं.स.)। हिमायतनगर तालुक्यातील पवना शिवारात उमरी भागातील उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून साखर कारखाना उभा राहणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. पवना गावच्या शेतकऱ्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचे माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले.
हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील शेतकऱ्यांनी व्हीपीके उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांना साखर कारखाना उभारण्यासाठी जागा दिली आहे. त्या शेतकऱ्यांचा सत्कार कवळे गुरुजी व माजी आ. जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला
. यावेळी माजी आ. जवळगावकर म्हणाले की, कवळे गुरुजी यांनी हिमायतनगर तालुक्यात ऊस कारखाना उभा करण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी हिताचा कौतुकास्पद असून हा कारखाना उभा करण्यासाठी या भागातील शेतकरी आपल्या सदैव पाठीशी खंबीरपणे असणार आहेत.
कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही. कारखाना जमेल तेवढया गतीने काम सुरु करून उभा राहिला पाहिजे. ऊस कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाढ होणार असून या भागातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असून आपल्या माध्यमातून अनेक दिवसाची मागणी पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी कवळे गुरुजी म्हणाले की, हिमायतनगर भागातील जमीन सुपिक असून या भागात कारखाना उभा राहिल्यास ऊस उत्पादन वाढणार आहे त्यामुळे शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करेल म्हणून विचार झाला. पवना गावातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा मदतीने कारखाना उभा करण्याचे स्वप्न असून तुमच्या सर्वांच्या पुढाकाराने पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी संगितले.
यावेळी उपस्थित नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार कवळे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष शेख रफीक भाई, तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, संदीप पाटील कवळे यांच्यासह हदगाव, हिमायतनगर व उमरी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis