किनवट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू - सुजाता एंड्रलवार
नांदेड, 6 जानेवारी, (हिं.स.)। किनवट नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेतून बहुमताने निवडून आलेल्या नगराध्यक्षा सौ. सुजाताताई एंड्रलवार यांचा पदग्रहण समारंभ थाटामाटात ढोल ताश्याच्या गजरात पार पडला. पदभार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना आणि अध्यक
किनवट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही


नांदेड, 6 जानेवारी, (हिं.स.)। किनवट नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेतून बहुमताने निवडून आलेल्या नगराध्यक्षा सौ. सुजाताताई एंड्रलवार यांचा पदग्रहण

समारंभ थाटामाटात ढोल ताश्याच्या गजरात पार पडला. पदभार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना आणि अध्यक्षीय समारोपात बोलताना त्यांनी, मतदारांनी आमच्या आघाडीवर विश्वास ठेवून जो कौल दिला आहे, त्याचे आम्ही ऋणी असून किनवट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली. या पदग्रहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून खा. नागेश पाटील आष्टीकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्या श्रीमती बेबीताई नाईक उपस्थित होत्या.

विशेष म्हणजे, काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने उमेदवारीचा त्याग करून उबाठा सेनेच्या उमेदवारास पाठिंबा दिल्यानंतर आघाडीच्या नगराध्यक्षांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.

पदग्रहण समारंभानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रोटोकॉलनुसार नगराध्यक्षांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. नूतन नगराध्यक्ष शहराच्या विकासाला निश्चितच गती देतील, अशी अपेक्षा नागरीकांमधून व्यक्त होत आहे. मात्र, विकासकामांच्या बाबतीत अनेक गंभीर आव्हाने त्यांच्यासमोर उभी आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत वाढीव पाणीपुरवठा नळयोजनेसाठी तब्बल १९ कोटी ५ लाख रुपये खर्च झाल्यानंतरही आजतागायत काम अपूर्ण आहे.

या शिवाय शहर स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून सार्वजनिक प्रसाधनगृहांची नितांत गरज आहे. अशा अनेक मूलभूत नागरी सुविधांकडे प्रशासनाला गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.

विरोधी बाकावर भाजप महायुतीकडे संख्याबळ अधिक असून प्रशासन चालवण्याचा अनुभवही मोठा आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीसमोर हे एक मोठे आव्हान असणार आहे. येत्या काळात किनवटच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande