रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठ-कोकण कृषी विकास प्रतिष्ठानमध्ये करार
रत्नागिरी, 6 जानेवारी, (हिं. स.) : शहरी शेती आणि नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात विस्तार, प्रशिक्षण, क्षमता बांधणी व संशोधन कार्य अधिक बळकट करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि मुंबईतील कोकण कृषी विकास प्रतिष्ठान यांच्यात नुकताच सामंज
कोकण कृषी विद्यापीठ-कोकण कृषी विकास प्रतिष्ठानमध्ये करार


रत्नागिरी, 6 जानेवारी, (हिं. स.) : शहरी शेती आणि नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात विस्तार, प्रशिक्षण, क्षमता बांधणी व संशोधन कार्य अधिक बळकट करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि मुंबईतील कोकण कृषी विकास प्रतिष्ठान यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.विद्यापीठाच्या दापोली येथील परिसरात कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला.यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. नारखेडे, प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शेखर सावंत, कार्यक्रम समन्वयक डॉ. मंदार गीते यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ प्राध्यापक उपस्थित होते.

या कराराअंतर्गत दोन्ही संस्था संयुक्तपणे प्रात्यक्षिके, प्रदर्शने, जनजागृती उपक्रम, कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण, क्षमता बांधणी कार्यक्रम आणि अभ्यास दौरे आयोजित करणार आहेत. यामध्ये विशेषतः शहरी शेती, नैसर्गिक शेती आणि शेतकरी व शहरी उत्पादकांच्या कौशल्य विकासावर भर दिला जाईल. या उपक्रमाचा मुख्य लाभ नवी मुंबईसह इतर शहरी व उपनगरीय भागातील शेतकरी, नागरिक आणि कृषी उद्योजकांना होणार आहे. प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. सावंत यांनी याप्रसंगी नवी मुंबईत शहरी शेती उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची गरज व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. भावे यांनी नमूद केले की, संशोधन प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थात्मक भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. शहरी आणि नैसर्गिक शेती ही भविष्यातील महत्त्वाची क्षेत्रे असून शाश्वत अन्नप्रणाली, स्मार्ट शेती आणि रोजगार निर्मितीसाठी यात मोठी संधी आहे. शहर नियोजनात शहरी शेतीचा समावेश करणे आणि स्टार्ट-अप्सना तांत्रिक मार्गदर्शन देणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.डॉ. संतोष वरवडेकर यांनी स्वागत करून विद्यापीठाच्या आणि प्रतिष्ठानच्या कार्याची पार्श्वभूमी मांडली. हा करार शहरी व निमशहरी भागातील शाश्वत विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande