
नाशिक, 06 जानेवारी (हिं.स.)। नाशिक आगामी वर्षात नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जगभरातून साधू-संत येणार आहेत. भारतीय जनता पक्ष हा कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष असून, येणाऱ्या नाशिक महानगर पालिका निवडणुकीत राणे हिंदुत्ववादी विचारांचा महापौर निवडून येईल, असा विश्वास मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नाशिकमध्ये झालेला एबी फॉर्मचा गोंधळ आता मागे टाकून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत आमच्यासोबत नसल्या तरी राज्यस्तरावर आम्ही एकत्र आहोत. आमच्या नेत्यांचे विचार समान असून कोणतेही मतभेद नाहीत. महापालिका निवडणुकीत नाशिकची जनता भाजपला आशीर्वाद देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या ठिकाणी हिंदूंवर अन्याय होतो, त्या ठिकाणी न्याय देण्याचे काम सुरू आहे.
पुढील टप्प्यात पुन्हा एकदा नाशिक महापालिकेच्या प्रचारासाठी येणार असल्याचेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ मंत्री नारायण राणे यांच्या निवृत्तीबाबतच्या संकेतांवर विचारले असता, वडील बोलल्यानंतर मुलगा बोलत नाही, असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया टाळली. यावेळी आ. सीमा हिरे यांच्यासह भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV