
मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.) : मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात अनेक संस्था विना नोंदणी कार्य करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा संस्थांची कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर रविकिरण पाटील यांनी केले आहे.
दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांना सक्षम अधिकारी घोषित करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.
दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ नुसार संस्थेची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील ज्या संस्थांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करायचे आहे, त्यांनी संस्थेच्या नोंदणीचा प्रस्ताव संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाकडे सादर करावा.
नोंदणी न करता कार्यरत असलेल्या संस्थांवर दिव्यांग हक्क अधिनियमनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर