
रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामोठे प्रभाग क्रमांक १२ मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मध्ये उमेदवारीवरून उघड फूट पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रभाग १२ (अ) ही अनुसूचित जातीसाठी राखीव जागा ‘आयात’ उमेदवाराला देण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, या नाराज गटाने बौद्धजन पंचायतीचे सक्रिय कार्यकर्ते आशिष कदम यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी कोणतीही चर्चा न करता प्रभाकर कांबळे यांची उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप नाराज गटाने केला आहे. या निर्णयामुळे पक्षातील जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांची उपेक्षा झाल्याची भावना निर्माण झाली आहे. “महायुतीचा धर्म आम्ही पाळू, पण स्थानिक पातळीवर रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गळचेपी सहन केली जाणार नाही,” अशी ठाम भूमिका मोहनीष गायकवाड यांच्यासह नाराज कार्यकर्त्यांनी मांडली.
या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार आशिष कदम यांच्या नावावर एकमत झाले आहे. कदम यांचा कामोठे परिसरात मोठा जनसंपर्क असून, बौद्ध पंचायतीच्या माध्यमातून त्यांनी केलेली सामाजिक व लोकहिताची कामे सर्वश्रुत आहेत. स्थानिक समस्या, नागरी प्रश्न आणि समाजाच्या गरजांची सखोल जाण असलेला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. ‘आयात’ उमेदवाराऐवजी ‘स्थानिक’ चेहरा हवा, या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी कदम यांना पसंती दिली आहे.
दरम्यान, वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाविरोधात उघडपणे व्यक्त झालेल्या नाराजीमुळे महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकृत उमेदवारासमोर आता अपक्षाच्या रूपाने तगडे आव्हान उभे राहत असून, कामोठे प्रभाग १२ मधील निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके