
परभणी, 06 जानेवारी (हिं.स.)। परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नदीप रमेशचंद्र (सावजी) कळमकर तर उपाध्यक्षपदी डॉ. अशोक कुलकर्णी सेलगांवकर व हरिकिशन शर्मा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
परभणी जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच पतसंस्थांच्या विविध अडचणी मार्गी लावण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची पहिली सर्वसाधारण सभा आज मंगळवार 6 जानेवारी रोजी जिंतूर येथील फेडरेशनच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी अर्थपूर्तीचे उपाध्यक्ष किशोर देशपांडे यांनी फेडरेशनच्या स्थापनेमागील भूमिका, उद्दिष्टे आणि भविष्यातील दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत फेडरेशनच्या अध्यक्षपदी कळमकर यांची, तर उपाध्यक्षपदी डॉ. सेलगांवकर व शर्मा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना कळमकर म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या पतसंस्थांना भेडसावणार्या अडचणी सोडवणे, त्यांच्यात परस्पर समन्वय निर्माण करणे तसेच सहकार चळवळीला सक्षम आणि सकारात्मक दिशा देणे हे परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे प्रमुख उद्दिष्ट राहील. सर्व घटकांना विश्वासात घेऊन जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवा आयाम देण्यासाठी फेडरेशन प्रयत्नशील राहील, असा विश्वास व्यक्त केले.
रत्नदीप कळमकर यांचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रश्न प्रभावीपणे शासनदरबारी मांडले जातील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच उपाध्यक्षपदी डॉ. अशोक सेलगांवकर व हरिकिशनजी शर्मा यांच्या निवडीमुळे फेडरेशनला अनुभवी व सक्षम नेतृत्व लाभल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
या सभेला ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, सर्जेराव लहाने, केदार गजमल, डॉ. प्रकाश अकोशे, किरण चव्हाण, संग्राम सोनी, दिलीप कुलकर्णी, दिलीप देशपांडे, किशोर देशपांडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis