
कोल्हापूर, 06 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्र स्थापनेचा पन्नास वर्षाचा तरी कागद आहे काय ? मग पत्रकारांकडे कसले पुरावे मागता असा सवाल करत, पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात याचा पाठपुरावा करण्यासह पत्रकारांच्या शासन दरबारी प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी विधिमंडळात विविध माध्यमातून प्रश्न लावुन धरणार असल्याची ग्वाही काॅंग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
कोल्हापूरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लब, कोल्हापूर कार्यालयात मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार आणि २०२५ सालातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूर प्रेस क्लब चे अध्यक्ष शीतल धनवडे होते.
याप्रसंगी बोलताना प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर जेष्ठ पत्रकार सन्मान योजना संदर्भात जाचक अटीं तसेच निधी अभावी जेष्ठ पत्रकारांची शासन दरबारी होणारी हेळसांड निदर्शनास आणून दिली. तसेच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना डी.वाय.पाटील हाॅस्पिटलमार्फत कायमस्वरूपी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी विषेश योजना सुरू करावी.
कोल्हापूर प्रेस क्लब,कोल्हापूर च्या उत्पन्नवाढीसाठी नविन इमारत अद्ययावत करण्याची मागणी केली.विभागीय अधिस्वीकृतीचे अध्यक्ष समीर देशपांडे यांनीही पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या व्यक्त करताना पत्रकारांना लाभच मिळू न देणाऱ्या योजनांचे स्वरूप बदलण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना आ. सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या पत्रकारितेचा इतिहास मोठा असून अनेक दिग्गजांनी पत्रकारितेचा पाया रोवला आहे. हा वसा नव्या पिढीच्या पत्रकारांनी पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले. स्पष्ट आणि व्यवहारिक भूमिका मांडण हे आजच्या पत्रकारितेसमोर मोठे आव्हान असून, सत्य मांडण्यासाठी धाडस निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगतिले.
तसेच महानगरपालिका निवडणुकीनंतर डी.वाय .पाटील हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.संजय डी.पाटील यांच्याशी बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्यासाठी निश्चित वेगळे नियोजन केले जाईल याची ग्वाही दिली. पत्रकारांच्या प्रलंबित घरकुल योजना मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू अशी खात्रीही त्यांनी दिली.यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी,नंदकुमार ओतारी,संजय देसाई, संभाजी भोसले,शशी मोरे,प्राचार्य महादेव नरके यांच्यासह प्रसार माध्यमांतील सहकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar