
रत्नागिरी, 6 जानेवारी, (हिं. स.) : वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यशोत्सव २०२६ सोहळा येत्या रविवारी, दिनांक ११ जानेवारी रोजी मुंबईत परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात होणार आहे. त्यामध्ये गुहागरची कन्या सौ. प्रियांका प्रमोद गांधी यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ट्रस्टच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वैश्य समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यात येणार आहे. मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद सीताराम गांधी यांच्या पत्नी सौ. प्रियांका गांधी यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नेटवर्किंग, व्यवसायवृद्धी, रेफरल आणि नव्या संधींसाठी एक हा महोत्सव म्हणजे प्रभावी मंच ठरणार आहे. कार्यक्रमात उद्योजकता, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर आधारित प्रेरणादायी सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी प्रसिद्ध वक्ते प्रदीप लोखंडे, संतोष सकपाळ, दीपक शिंदे व आरती बनसोडे आपले विचार मांडणार आहेत.
वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना डॉ. संतोष कामेरकर यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी करण्यात आली असून संस्थेच्या कार्याला दीपक मेजारी, रूपाली तेलवणे, संजय भाट, चंद्रकांत खाड्ये, विष्णू सातवसे व मनोज आंग्रे या विश्वस्तांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत सुमारे ७०० वैश्य समाज बांधवांनी नोंदणी केली आहे. याप्रसंगी उद्योगरत्न पुरस्काराने गिरीश कोळवणकर, सौ. वृषाली सागर मोरये, राज साडविलकर, विनय पाताडे आणि विनायक धडाम, तर उद्योगश्री पुरस्काराने दयानंद माणगावकर व रामकृष्ण कोळवणकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला शालीग्राम खातू, संतोष भालेकर, भाई शेट्ये, तसेच वैश्य समाजातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित राहणार असून, देश-विदेशातील अनेक नामांकित उद्योगपतींचीही उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक असून त्यासाठी अजित लाड यांच्याशी ९८३३०३७३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी