लातूर - आमदार निलंगेकरांनी रिक्षातून केला प्रचार
लातूर, 06 जानेवारी (हिं.स.)। लातूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने यंदा सर्वसामान्य नागरिकांना उमेदवारी देत नवी दिशा दिली आहे. त्यातच रिक्षा चालकाच्या मुलाला उमेदवारी दिल्याने भाजपचा उमेदवार “रिक्षाचालकाचा मुलगा” म्हणून सध्या शहरात चर्चे
आमदार निलंगेकरांनी रिक्षातून केला प्रचार


लातूर, 06 जानेवारी (हिं.स.)। लातूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने यंदा सर्वसामान्य नागरिकांना उमेदवारी देत नवी दिशा दिली आहे. त्यातच रिक्षा चालकाच्या मुलाला उमेदवारी दिल्याने भाजपचा उमेदवार “रिक्षाचालकाचा मुलगा” म्हणून सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. या तरुण उमेदवाराचे नाव आयुष्यमान गडले असून तो अवघ्या २३ वर्षांचा आहे.

आयुष्यमान गडले हा प्रभाग क्रमांक ४, लेबर कॉलनी येथील रहिवासी आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीत वाढलेला आयुष्यमान वयाच्या १९व्या वर्षापासून भाजपचा बूथ प्रमुख म्हणून काम करत आहे. संघटनात्मक कामाचा अनुभव, पक्षाशी निष्ठा आणि सातत्यपूर्ण परिश्रम याची दखल घेत भाजपने त्याला थेट उमेदवारी दिली आहे. आयुष्यमानचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

या उमेदवारीच्या शुभारंभासाठी भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी थेट आयुष्यमान गडले यांच्या घरी रिक्षातून येत प्रचाराचा नारळ फोडला. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी रिक्षातूनच प्रचार करत सामान्य जनतेशी संवाद साधला.

“सामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी देणे, हीच खरी लोकशाही” असा संदेश भाजपकडून या माध्यमातून देण्यात आला आहे. आयुष्यमान गडले यांची उमेदवारी ही तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, भाजपच्या या निर्णयाचे शहरभर कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande