
रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। सामाजिक बांधिलकी व लोकसेवा हाच आपला धर्म मानून कार्यरत असलेले मुंबई मंत्रालयातील आदर्श तिगावचे सुपुत्र संकेत तुकाराम सानप यांनी पुन्हा एकदा जनसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाडाळणे, अकोले तालुका (जि. अहिल्यानगर) येथील अपघातग्रस्त रेखा तानाजी लांडे या गरजू महिला रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.
रेखा लांडे या गेल्या काही काळापासून अपघातानंतर गंभीर आजाराशी झुंज देत असून उपचारासाठी मोठ्या खर्चाचा सामना करावा लागत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबासाठी हा खर्च परवडणारा नसल्याने मदतीची गरज निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेत संकेत सानप यांनी आवश्यक वैद्यकीय कागदपत्रांसह शासन दरबारी पाठपुरावा करून प्रकरण मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सादर केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत निधी प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली १ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली.
सध्या रेखा तानाजी लांडे या संगमनेर येथील दीपक जाधव मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, मंजूर निधी थेट रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. या मदतीमुळे उपचार, औषधोपचार व इतर वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यास कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी संकेत सानप म्हणाले, “गरीब, शेतकरी, मजूर, दिव्यांग व आजारपणाशी झगडणाऱ्या प्रत्येक गरजू कुटुंबासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मोठा आधार आहे. शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे.” निधी प्रमुख रामेश्वर नाईक यांनीही या कार्याचे कौतुक करत तरुण प्रतिनिधींच्या सक्रिय पाठपुराव्याचे महत्त्व अधोरेखित केले.
रेखा लांडे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री, निधी प्रमुख तसेच संकेत सानप यांचे आभार मानले असून, या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे. जनसेवेच्या या कार्यामुळे समाजातील वंचितांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके