
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)। 16 जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि फातीमा शेख यांच्या जन्मोत्सवानिमित्त दिंद्रुड (ता. माजलगाव) येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत केंद्रस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 'लेक वाचवा, लेक शिकवा' अभियानांतर्गत या स्पर्धांचे उद्घाटन झाले.
या स्पर्धांमध्ये दिंद्रुड केंद्रातील एकूण १४ जिल्हा परिषद शाळांनी सहभाग घेतला आहे. माजी सरपंच अजय कोमटवार आणि सरपंच भाऊसाहेब सुरवसे यांच्या हस्ते फित कापून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख अमृत कुलकर्णी होते. जिजाऊ-सावित्री फातिमा जन्मोत्सवानिमीत्त केंद्रस्तरीय स्पर्धेचे येथील जि.प केंद्रीय शाळेत आयोजन करण्यात आले.पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये क्रीडा, सामान्य ज्ञान, वक्तृत्व आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. लांब उडी, उंच उडी, दोरीवरच्या उड्या आणि रिले धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या. कबड्डी, खो-खो, लंगडीसारख्या सांघिक खेळांचे आयोजन आहे. ९ जानेवारीला सामान्य ज्ञान स्पर्धा, १५ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम आणि गीत गायन स्पर्धा होणार आहेत. १६ जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा आणि बक्षीस वितरणाचा समारंभ होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis