
रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीतील कुंभारआळी परिसरात अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, कुंभारआळी मिनीडोर स्टँडलगत व वाघजाई मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे व सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः हैराण झाले आहे.
या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र रस्त्यालगत साचलेल्या घाणीमुळे नागरिकांना नाक दाबून चालावे लागत असून, दुर्गंधी व माशा, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया, हिवताप यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र तक्रारी करूनही केवळ तात्पुरती साफसफाई केली जाते, पुन्हा काही दिवसांत परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नियमित कचरा उचलला जात नसल्याने कचराकुंड्या ओसंडून वाहत असून, मोकाट जनावरे कचरा रस्त्यावर पसरवत असल्याने अस्वच्छतेत भर पडत आहे.
विशेष म्हणजे वाघजाई मंदिराकडे जाणारा हा मार्ग असल्याने भाविकांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ व सुंदर श्रीवर्धनची प्रतिमा या अस्वच्छतेमुळे मलिन होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शहरात अशी अवस्था शोभून दिसणारी नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ विशेष स्वच्छता मोहीम राबवून साचलेला कचरा हटवावा, नियमित कचरा व्यवस्थापन करावे तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके