
अमरावती, 06 जानेवारी (हिं.स.) अमरावती शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉन्स, केटरिंग व्यवसाय तसेच हॉस्पिटल, नर्सिंग होम व खाजगी दवाखान्यांनी कचऱ्याची शास्त्रशुद्ध व नियमबद्ध विल्हेवाट लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिले आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६, बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन नियम आणि स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, बीअर बार, कॅन्टीन, होस्टेल तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हॉकर्सकडून मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा तसेच उरलेले शिजवलेले अन्न निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटल, नर्सिंग होम, पॅथॉलॉजी लॅब व खाजगी दवाखान्यांमधून निर्माण होणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावता तो सार्वजनिक ठिकाणी टाकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
या पार्श्वभूमीवर १६, २६ डिसेंबर २०२५ व ५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटर आस्थापनांनी ओला व सुका कचरा वेगवेगळ्या कंटेनरमध्ये साठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंगल कार्यालये व लॉन्समधील उरलेले चांगले अन्न सेवाभावी संस्थांमार्फत गरजू नागरिकांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व आस्थापनांनी मनपा नियुक्त कंत्राटदारालाच कचरा देणे बंधनकारक राहील.
बायोमेडिकल वेस्ट संदर्भात शहरातील सर्व हॉस्पिटल व दवाखान्यांनी मनपाकडे नोंदणी करून केवळ अधिकृत एजन्सीकडेच कचरा द्यावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. सिरींज, इंजेक्शन, औषधी अवशेष सार्वजनिक ठिकाणी टाकणे गंभीर उल्लंघन मानले जाईल.दरम्यान, आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. कचरा संकलनात शिस्त, रात्रीची स्वच्छता, डस्टबिनसाठी योग्य जागा, तसेच नियमबाह्य कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिक व आस्थापनाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी