
लातूर, 6 जानेवारी, (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथे मुस्लिम बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेला 'इज्तमा' हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणारा सोहळा आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित इज्तमा कार्यक्रमाला पाटील यांनी सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी इज्तमा मधील शिस्त आणि सामाजिक सलोख्याबद्दल समाधान व्यक्त केले.
माध्यमांशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, या इज्तमासाठी अहमदपूर तालुक्यातील जवळपास ८४ गावांतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. आपल्या धर्माचे आचरण कसे करावे आणि ईश्वराचे स्मरण कसे करावे, याचे मोलाचे मार्गदर्शन आणि शिकवण या ठिकाणी दिली जाते. विशेष म्हणजे, या धार्मिक आयोजनात टाकळगाव येथील हिंदू बांधवांनी देखील पुढाकार घेऊन मुस्लिम बांधवांना मोठी मदत केली आहे. हे चित्र आपल्या देशाच्या विविधतेतील एकतेचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत उदाहरण आहे. इज्तमाची शिस्त नेहमीच वाखाणण्याजोगी असते आणि त्याचेच प्रत्यंतर आज येथे पाहायला मिळाले, असेही पाटील यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis