नांदेड - 'विमान वारी' अंतिम निवड चाचणीला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड, 6 जानेवारी, (हिं.स.)। नूतन सेवाभावी व शिक्षण संस्था व पंचायत समिती उमरीच्या वतीने घेण्यात आलेल्या ''विमान वारी'' अंतिम निवड चाचणीला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन विद्याथ्यांना विमा
नांदेड - 'विमान वारी' अंतिम निवड चाचणीला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद


नांदेड, 6 जानेवारी, (हिं.स.)। नूतन सेवाभावी व शिक्षण संस्था व पंचायत समिती उमरीच्या वतीने घेण्यात आलेल्या 'विमान वारी' अंतिम निवड चाचणीला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन विद्याथ्यांना विमानाने दिल्ली भेट घडवून आणणे, हा उद्देश समोर ठेवून 'उमरीची भरारी, संविधान दरबारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम यावर्षी आयोजित करण्यात आला. पहिली चाचणी शाळांस्तर घेण्यात आली.

यात १४ हजार विद्यार्थी सहभागी झाले. दुसरी चाचणी केंद्र स्तरावर घेण्यात आली, त्यात ७५०० जण सहभागी झाले. केंद्र स्तरावर गुणवंत ठरलेल्या १०२६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाचणी पार पाडली. या चाचणीसाठी कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयात बैठक व्यवस्था करण्यात आली होती. चाचणी पार पडल्यानंतर महाविद्यालय प्रांगणात समारोप कार्यक्रम घेण्यात आला.

या सोहळयास उमरी बाजार समितीचे सभापती शिरीष गोरठेकर अध्यक्षस्थानी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाएटचे प्राचार्य अमोल निळेकर, डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता बालाजी शेळके उपस्थित होते. जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, प्राचार्य पुरुषोत्तम गाटे सर, माजी जि.प.सदस्य आनंदराव यलमगोंडे उपस्थित होते. उमरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांनी उपक्रमाचा हेतू व आजवरची वाटचाल याबाबत प्रास्तविकातून माहिती दिली. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे प्रमुख कैलास देशमुख गोरठेकर यांनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व त्यांच्या टीमचे कौतुक करून यात मला सहभागी करून घेतले हे मी माझे भाग्य समजतो, असे उद्गार काढले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande