
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)परळी वैद्यनाथ व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दर्पण दिन या कार्यक्रमास माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून आचार्यांना व महापुरुषांना अभिवादन करून उपस्थित पत्रकार बांधवांशी संवाद साधला.
पत्रकारिता हा सामाजिक आणि राजकीय जीवनात आरसा दाखवणारे एक माध्यम तर आहेच पण आपण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दर्जा दिलेला आहे. एकीकडे आचार्य बाळशास्त्री यांच्या सारख्या महान पत्रकारांनी समाजातील अडचणी, समस्या मांडण्याचे व त्यावरून व्यवस्थेला जाब विचारण्याचे अनेक उदाहरण प्रस्थापित केले. आजही अनेक पत्रकार बांधव हा वसा प्रामाणिकपणे व अत्यंत निष्ठेने सांभाळत आहेत. मात्र काही अंशी का असेना टी आर पी मिळवण्याच्या नावाखाली भडक मथळे देऊन वृत्त व्यवस्थेला विचार करायला भाग पाडणारी आजची पत्रकारिता काही प्रमाणात उथळ देखील झाली आहे.
सकारात्मक पत्रकारिता ही अधिक परिणामकारक ठरते, त्यामुळे आपल्यातील विचार जागृत ठेवून पत्रकारितेच्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचे आवाहन यावेळी केले. याप्रसंगी परळी वैद्यनाथ शहर व तालुक्यात वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य केलेले पत्रकार प्रा. श्री. लक्ष्मण वाकडे यांचा भास्करराव जोशी स्मृती जगमित्र पुरस्कार, प्रा. श्री. प्रवीण फुटके यांचा कैलास शर्मा स्मृती पुरस्कार, श्री. धनंजय आढाव यांचा मोहनलाल बियाणी स्मृती पुरस्कार, श्री. ओमप्रकाश बुरांडे यांचा प्रकाश नव्हाडे स्मृती पुरस्कार, श्री. आत्मलिंग शेटे यांचा एम. पी. कणके स्मृती पुरस्कार, श्री. धनंजय आरबुने यांचा प्रशांत जोशी स्मृती पुरस्कार प्रदान करून गौरव सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis