
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शहरात प्रचारासाठी आले होते. यावेळी घेतलेल्या सभेत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना लातूरच्या राजकारणाचा उल्लेख केला. भाषणाच्या ओघात त्यांनी, लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसतोय, तो पाहता विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात शंका नाही, असे विधान केले. या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले असून, विशेषत: काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असताना रविन्द्र चव्हाण यांनी प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसताच दिलगिरी व्यक्त केली.
रविंद्र चव्हाण यांच्या या वक्तव्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. लातूरमध्ये विलासराव देशमुख हे केवळ राजकीय नेते नव्हे, तर जनतेच्या मनात खोलवर रुजलेले नेतृत्व मानले जाते. त्यांच्या कार्यकाळात लातूर आणि परिसराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण आजही नागरिक कृतज्ञतेने काढतात. त्यामुळे आठवणी पुसल्या जातील, या विधानाला अनेकांनी लातूरच्या अस्मितेला आव्हान देणारे म्हटले आहे.
एकूणच, रवींद्र चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे लातूरच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. रितेश देशमुख यांची भावनिक पण ठाम प्रतिक्रिया, तसेच काँग्रेस नेत्यांचा आक्रमक पवित्रा पाहता, येत्या काळात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे. विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्याचा दावा करणा-यांना लातूरकर आणि महाराष्ट्रातील जनतेकडून कसा प्रत्युत्तर दिले जाईल, याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता होती. त्यामुळे अखेर रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. विलासराव देशमुख यांच्या नावाने काँग्रेस मते मागत आहेत. त्यामुळे मी तसे वक्तव्य केले होते. मात्र, त्यांच्या मुलांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis