
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)।
बीड जिल्ह्यात या वर्षी दसरा, दिवाळीपर्यंत पाऊस पडला आहे. या पावसामुळे जिल्ह्यात बऱ्याच वर्षांनंतर रब्बीचा पेरा वाढला आहे. यंदा जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच सव्वाशे टक्के पेरणी झाली आहे. पाणी उपलब्ध असल्यामुळे गव्हाची दीडशे टक्क्यांहून अधिक पेरणी झाली आहे.
बीड जिल्ह्यत गेल्या काही वर्षांत कमी पाऊस असल्यामुळे दुष्काळाचे सावट होते जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६६६ मिमी असताना समाधानकारक पाऊस पडत नव्हता. त्यामुळे रब्बी पिकांची शाश्वती शेतकऱ्याला नव्हती. त्यामुळे गेल्या काही वषांत रब्बी पेरणी घटली. मात्र, या वर्षी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला.
जिल्ह्यातील १४२ सिंचन तलावापैकी बहुतेक प्रकल्प भरून वाहत आहेत. दिवाळीदरम्यान पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस, बाजरी ही खरीप पिके पाण्यात गेल्याने उत्पादन घटले. त्यामुळे खरीप पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी रब्बीकडे शेतकऱ्याचा कल आहे. खरीप घटल्यानंतर या वर्षी झालेल्या दमदार पावसाने रब्बीच्या पिकावर बळीराजाची आस आहे. त्यामुळे जिल्ह्यात रब्बीचा पेरा वाढला आहे.
जिल्ह्याचे 'रब्बी'चे क्षेत्र सरासरी क्षेत्र दोन लाख ७६ हजार हेक्टर आहे. मात्र जिल्ह्यात या तुलनेत आत्तापर्यंत तीन लाख ४६ हजार ९४३ हेक्टर वर पेरणी झाली आहे. यंदा रब्बी पेरा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी ज्वारीचा पेरा होईल अशी अपेक्षा होती. ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र रब्बी ज्वारीची एक लाख २८ हेक्टर आहे. या तुलनेत एक लाख ३३ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा उरकला आहे. तर या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज होता. हा अंदाज बरोबर ठरला आहे. जिल्ह्याचे गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३१ हजार हेक्टर आहे. या तुलनेत आतापर्यंत ४७हजार ६३५ हेक्टरवर गहू पेरणी झाली. गव्हाची सरासरीच्या १५३ टक्के पेरणी झाली आहे. हरभऱ्याला मिळणाऱ्या भावामुळे हरबरा पेरण्याकडे कल आहे. हरबऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख सहा हजार असताना त्या तुलनेत जिल्ह्यात एक लाख ३३ हजार ९०० हेक्टरवर हरबरा पेरण्यात आला. चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कल गहू आणि हरबरा पिकाकडे जास्त असल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis