
लातूर, 6 जानेवारी, (हिं.स.)। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही लादलेल्या उमेदवारापेक्षा लोकांनी शिफारस केलेले आणि जनमानसात मिसळलेले उमेदवारच रिंगणात उतरवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले. चाकूर तालुक्यातील रोहिणा येथे आयोजित जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव काळे, नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे, बाजार समितीचे संचालक यशवंतराव जाधव, तालुका कार्याध्यक्ष भानुदासराव पोटे, सरपंच दयानंदराव सुरवसे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याला संबोधित करताना नामदार पाटील म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या असल्या तरी त्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक प्रामुख्याने स्थानिक प्रश्नांवर आधारित असते, त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना स्थानिक प्रश्नांचा सखोल अभ्यास आहे आणि जे जनतेत राहून त्यांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता ठेवतात, अशाच खऱ्या कार्यकर्त्यांना यावेळेस संधी दिली जाईल. रोहिणा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना मागील काळात न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि उर्वरित प्रश्न आगामी निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी म्हणून प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या मेळाव्याला रोहिणा मतदारसंघातील १८ गावांतील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिलालखा पठाण यांनी केले.
सहकार मंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीला विजयी करा: मच्छिंद्र नागरगोजे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मेळाव्याचे आयोजक मच्छिंद्र नागरगोजे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, आपल्या भागाचे नेतृत्व राज्याचे सहकार मंत्री करत असल्यामुळे विकासासाठी निधीची कमतरता कधीही भासणार नाही. जर आपण नामदार बाबासाहेब पाटील यांच्या विचारांचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीवर पाठवले, तर आपल्या भागाला अधिक निधी मिळवणे सोपे होईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून सहकार मंत्र्यांचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis