
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यामध्ये आता सलग पाच दिवस तापमान १३ अंशांवर स्थिरावणार असून थंडीत वाढ झाली आहे. एका दिवसात किमान तापमान ७ अंशाने घटले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस तापमान स्थिर राहणार आहे.मात्र, बोचरी थंडी कायम राहील.आगामी ० जानेवारीदरम्यान कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १२ ते १३ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ८ जानेवारीला पारा १२ अंशांवर घसरणार आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवणार आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे बीडमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटेच्या वेळी काही भागांत हलके धुके दिसत आहे. आकाश निरभ्र आणि कोरडे आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा जाणवत आहे. ५ जानेवारीला किमान तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार ५, ६ आणि ७ जानेवारीला कमाल तापमान ३० अंश राहील. किमान तापमान १३ अंश असेल. ८ जानेवारीला किमान तापमान १२ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. ९ आणि १० जानेवारीला पुन्हा किमान तापमान १३ अंशांवर स्थिर राहील. १० जानेवारीला कमाल तापमान ३१ अंशांवर पोहोचेल. जानेवारी महिना बीडसाठी सर्वात थंड मानला जातो. एकूणच हा आठवडा बीडकरांसाठी आता थंडीचाच जाणार अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis