
मुंबई, 6 जानेवारी, (हिं.स.)। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
सुरेश कलमाडी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सुरेश कलमाडी यांनी भारतीय वायुसेनेतल्या गौरवशाली कारकिर्दीनंतर समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली. पुणे युवक काँग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून तरुणांचे संघटन केले. पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवत ते खासदार झाले. दीर्घ काळ त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. स्व. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात रेल्वे खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांना जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. भारतीय ॲालिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष कार्य केले. दिल्लीतल कॉमनवेल्थ गेम्स आणि पुण्यातील कॉमनवेल्थ युथ गेम्सचे यशस्वी आयोजन करून उत्तम क्रीडा प्रशासक असल्याचे त्यांनी सिद्ध केले. पुणे शहराच्या विकासात तसेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. पुणे मॅरेथॉन, चित्रपट महोत्सव आणि पुणे फेस्टिव्हलच्या माध्यामातून पुण्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले.
विरोधकांनी त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची प्रचंड बदनामी करत, त्यांच्या धडाकेबाज कारकिर्दीवर डाग लावण्याचा प्रयत्न केला. पण न्यायदेवतेने सर्व आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता केली. पुणे शहरात काँग्रेस मजबूत करून कार्यकर्त्यांची पिढी त्यांनी घडवली. कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कलमाडी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर