
सांगली, 6 जानेवारी, (हिं.स.)। स्व. विलासराव देशमुख साहेब यांची कारकीर्द राजकारणात येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी होती. आपल्या महाराष्ट्राने जो काही विकास साधला आहे, त्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही, त्यांनी लातूर-महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान कधीही विसरले जाणार नाही अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यंमत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी निषेध नोंदवला.
जयंतराव पाटील म्हटले की, कोणी काहीही म्हटले तरी एका व्यक्तीने पेरलेले विचार आणि त्यांनी केलेली कामे कधीही पुसली जावू शकत नाही. विचार पटत नाही म्हणून महात्मा गांधींचीही हत्या केली गेली पण गांधींचा विचार आजही जिवंत आहे, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान पुसले जाऊ शकत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर