
परभणी, 06 जानेवारी (हिं.स.)। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी, तालुका विधी सेवा समिती ,गंगाखेड तसेच जिल्हा प्रशासन यांच्यावतीने दि. 18 जानेवारी, रोजी सकाळी 10 वाजता संत जनाबाई महाविद्यालय, कोद्री रोड, गंगाखेड येथे विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या महावेळाव्याचा मुख्य विषय “ज्येष्ठ नागरिकंसाठीच्या योजना व वैद्यकीय तपासणी” असून त्या व्यतिरिक्त समाजातील दुर्बल, वंचित घटकांना शासकीय कार्यालयातील विविध लोककल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करणे तसेच त्याचा लाभ मिळविण्यासाठी कायदेविषयक जनजागृती करणे हा शिबिराचा उद्देश आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय विभागांतर्गत त्यांच्या कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा व योजनांबाबतही माहिती व लाभ देण्याकरीता महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे आणि न्यायमुर्ती संजय ए. देशमुख, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायाधीश, परभणी जिल्हा यांच्या हस्ते महाशिबीराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला एम. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नितीशा माथुर याच्या उपस्थितीमध्ये हे महाशिबीर होणार आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी महाशिबीराला उपस्थित राहून शासकीय योजनांबाबत माहिती करुन घ्यावी व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भुषण काळे आणि गंगाखेड वकील संघाचे अध्यक्ष मिलिंद क्षिरसागर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis