
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)। रोटरी क्लब ऑफ बीड आणि विठाई हॉस्पिटल, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने, कै. डॉ. श्रीहरी लहाने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित तीन दिवसीय तपासणी व क्षारसूत्र पद्धतीने शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीपणे पार पडले.
या शिबिरामध्ये मूळव्याध, भगंदर, फिशर व नासूर अशा आजारांवरील तपासणी व उपचार करण्यात आले. तीन दिवसांच्या कालावधीत एकूण २५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे ६० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याशिबिरासाठी अहमदाबाद (गुजरात) येथील सुप्रसिद्ध मूळव्याध शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. देवेंद्र शाह आणि त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने विशेष योगदान दिले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक क्षारसूत्र उपचार पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, विठाई हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अमोल लहाने, छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकेचे चेअरमन अजय जाहेर पाटील, तसेच रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष रो.विकास उमापूरकर, सचिव रो. सुमित जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.
----------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis