प्रभाकर सोनवणेंच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपामध्ये धुसफुस
जळगाव, 7 जानेवारी, (हिं.स.)चोपडा विधानसभा मतदारसंघातून ‘उबाठा’ गटाचे उमेदवार राहिलेले प्रभाकर गोटू सोनवणे यांनी पुन्हा एकदा भाजपची वाट धरल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांच्या या भाजपा प्रवेशामुळे भाजपमधील निष्ठावंत आणि महायुतीतील घटक पक्ष असल
प्रभाकर सोनवणेंच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपामध्ये धुसफुस


जळगाव, 7 जानेवारी, (हिं.स.)चोपडा विधानसभा मतदारसंघातून ‘उबाठा’ गटाचे उमेदवार राहिलेले प्रभाकर गोटू सोनवणे यांनी पुन्हा एकदा भाजपची वाट धरल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांच्या या भाजपा प्रवेशामुळे भाजपमधील निष्ठावंत आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच धुसफुस सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रभाकर सोनवणे यांचा राजकीय प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. २०१४ मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ते मार्केट कमिटीचे संचालक झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर त्यांच्या पत्नी अंजनाताई सोनवणे यांनी जळगाव शहरात वॉर्ड क्र. १३ मधून भाजपच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा बंडखोरी करत भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि ‘उबाठा’ गटाकडून निवडणूक लढवली. आता अवघ्या काही दिवसांतच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

चर्चेनुसार, प्रभाकर सोनवणे हे आपल्या पत्नी अंजनाताई सोनवणे यांच्यासाठी म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र, याच गटातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज हे गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत आहेत. जळकेकर महाराज हे भाजपचे निष्ठावान चेहरा मानले जातात. आता पक्षाने आयत्या वेळी आलेल्या बंडखोरांना संधी दिल्यास, निष्ठावंतांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पक्षासाठी सातत्याने झटणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून वारंवार पक्ष बदलणाऱ्यांना रेड कार्पेट दिले जात असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. विशेषतः शिंदे गटाच्या उमेदवारासमोर दोन वेळा बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या सोनवणेंना पुन्हा पक्षात घेतल्याने शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्येही तीव्र नाराजी आहे.दुसरीकडे म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेचे युवा नेते पवन सोनवणे तयारी करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande