बीएलओंना निवडणूक काम टाळता येणार नाही - आयुक्त रवींद्र जाधव
मालेगाव, 07 जानेवारी (हिं.स.)। : बीएलओ निवडणूक काम टाळता येणार नाही त्यासाठी त्यांनी तातडीने हजर व्हावे असे आदेश मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जाधव यांनी दिले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगली
बीएलओना निवडणूक काम


मालेगाव, 07 जानेवारी (हिं.स.)।

: बीएलओ निवडणूक काम टाळता येणार नाही त्यासाठी त्यांनी तातडीने हजर व्हावे असे आदेश मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जाधव यांनी दिले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

१५ जानेवारीला होऊ घातलेल्या मालेगाव महापालिका निवडणुकीच्या तयारीने प्रशासकीय पातळीवरून आता वेग पकडला आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे एक प्रशिक्षण नुकतेच पार पडले असून दुसरे प्रशिक्षण गुरुवारी होत आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील २५० तर बागलाण व कळवण तालुक्यातील २०० मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) समावेश आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून त्या-त्या ठिकाणी काम करीत असल्यामुळे महापालिका निवडणूक कर्तव्यातून सूट देण्यात यावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून केली गेली होती, परंतु मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त रवींद्र जाधव यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. निवडणूक ड्युटीसाठी नियुक्त केलेल्या सर्व बीएलओ यांना निवडणूक कामात सहभागी होणे, अनिवार्य असल्याचे जाधव यांनी बजावले आहे.

मालेगाव महापालिका निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १,२ व ३ तसेच शिपाई अशा एकूण ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मालेगाव शहर व तालुका भागासह शेजारील बागलाण व कळवण तालुका तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. गेल्या २८ डिसेंबर रोजी या कर्मचाऱ्यांसाठी पहिले प्रशिक्षण पार पडले. या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांमध्ये चाळीसगाव, बागलाण व कळवणमधील सुमारे ४५० कर्मचारी नोकरीच्या ठिकाणी बीएलओ म्हणून विधानसभा मतदार याद्यांच्च सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कामाची जबाबदारी पार पाडत आहेत. ही जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने पहिल्या प्रशिक्षणासाठी हजर राहिले तरी, मालेगावातील निवडणुकीच्या कामातून आम्हाला सूट मिळावी, अशी विनंती या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती.

महापालिका प्रशासनाने मात्र या कर्मचाऱ्यांची विनंती फेटाळून लावली आहे. प्रत्यक्ष मतदानाचे कामकाज अत्यंत मर्यादित कालावधीचे म्हणजे केवळ दोन दिवसाचे आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. मोठ्या संख्येने असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द केल्यास पर्यायी व्यवस्था करणे अशक्य असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. शिवाय मालेगावातील बीएलओ यांना सुद्धा महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि नाशिक व जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्राद्वारे अवगत करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडे विचारणा केल्यावर या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून सूट देता येणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे बीएलओ म्हणून जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची महापालिका निवडणुकीसाठी केलेली नियुक्ती कोणत्याही स्थितीत रद्द केली जाणार नसल्याचे आयुक्त जाधव यांनी नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande