
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असताना शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक ९२ मधून निवडणूक लढवणारे हाजी सलीम कुरेशी यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.
बुधवारी, ७ जानेवारी रोजी ते वांद्रे येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात प्रचारासाठी गेले असताना हल्लेखोराने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. या हल्यात कुरेशी गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. मतदानाची तारीख जवळ येत असताना उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचारतळावर चुरस वाढली असतानाच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हाजी सलीम कुरेशी यांनी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षातून बाहेर पडत शिंदेसेनेत प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule