
सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आंबेडकरी मतदान असलेल्या अनेक प्रभागांमध्ये यंदा काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यातच प्रभाग क्रमांक चार विशेष लक्षवेधी ठरत असून, मागील निवडणुकीत येथे भारतीय जनता पार्टीचे पॅनल निवडून आले होते. मात्र यंदा भाजपसमोर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आव्हान उभे राहिले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची युती झाल्याने दोन्ही पक्षांची ताकद प्रभागात वाढलेली दिसत आहे. या युतीमुळे प्रभाग क्रमांक चारमधील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उच्चशिक्षित सी.ए. सुशील बंदपट्टे यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या सोबत माजी गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या पत्नी कविता चंदनशिवे, सारिका फुटाणे आणि विश्वनाथ बिडवे हे उमेदवार मैदानात आहेत. सर्वसमावेशक आणि अनुभवी उमेदवारांचा समावेश असल्याने राष्ट्रवादीचे हे पॅनल तगडे मानले जात आहे.
दुसरीकडे भाजपने दिलेल्या उमेदवारांविरोधात प्रभागात प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे. नगरसेवक असताना केलेल्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये असंतोष असून, यंदा त्यांना पुन्हा संधी न देता परिवर्तन करण्याचा निर्णय मतदार घेण्याच्या मनःस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे प्रभाग क्रमांक चारमधील ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता असून, निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड