
रायगड, 07 जानेवारी (हिं.स.)
पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला सातत्याने धक्के बसत असून, त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) बसताना दिसत आहे. काळुंद्रे गावात शेकाप व शिवसेना ठाकरे गटातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काळुंद्रे येथील शेकापचे सक्रिय कार्यकर्ते व काळुंद्रे प्रकल्पग्रस्त संघटनेचे उपाध्यक्ष संतोष बळीराम म्हसकर, ज्येष्ठ कार्यकर्ते बाजीराव मधुकर घरत, अनिल धाऊ म्हात्रे, शिवसेना ठाकरे गटाचे अविनाश मधुकर म्हसकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली. तसेच काळुंद्रे सिडको महिला मंडळाच्या राजकुमारी हिरालाल मीना, पुष्पा पाटील, श्री महिला बचत गटाच्या स्वाती जाधव, विनिक्षा कासार, मोनाली शिंदे, ज्युली सिंग, अनिता सिंग, मणिमाला गणेशन, अकलोशी मीना, कलादेवी व पिंकी मीना यांनीही त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, सुनील बहिरा, प्रभाग क्रमांक २० चे अध्यक्ष रघुनाथ बहिरा, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर म्हात्रे, काळुंद्रे गाव अध्यक्ष बाळाराम चिखलेकर, बूथ अध्यक्ष विशाल म्हसकर, नरेश घरत, सचिन चिखलेकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या कल्पना पाटील, प्रभाग २० युवा अध्यक्ष विकास म्हसकर, सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
काळुंद्रे गाव प्रभाग क्रमांक २० मध्ये समाविष्ट असून, येथून अजय बहिरा व प्रियांका कांडपिळे हे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित एका जागेसाठी भाजप महायुतीच्या उमेदवार श्वेता बहिरा निवडणूक लढवत असून, या पक्षप्रवेशामुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके