चंद्रपूर : मतदान जनजागृतीसाठीच्या निबंध स्पर्धेत ५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
चंद्रपूर, 07 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदानाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मनपा व खाजगी अश्या ५० शाळा मिळून जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांनी भाग
चंद्रपूर : मतदान जनजागृतीसाठीच्या निबंध स्पर्धेत ५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग


चंद्रपूर, 07 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदानाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मनपा व खाजगी अश्या ५० शाळा मिळून जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

स्वीप अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून “चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ व माझे कर्तव्य” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर निबंध स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे, मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच भावी मतदार म्हणून त्यांची जबाबदारी समजावून सांगणे हा होता.

या निबंध स्पर्धेत चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळांसह शहरातील खाजगी शाळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. एकूण ५० शाळांमधील सुमारे ५,००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून लोकशाही प्रक्रियेबाबत आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधातून मतदानाचा अधिकार, नागरिकांचे कर्तव्य, स्वच्छ व निर्भीड निवडणूक प्रक्रिया तसेच लोकशाही सुदृढ करण्यामध्ये मतदारांची भूमिका यावर प्रभावीपणे प्रकाश टाकला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, ते आपल्या कुटुंबीयांपर्यंतही मतदानाचा संदेश पोहोचवतील, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. पुढील काळातही SVEEP अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबवून नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande