भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष मोहीम
चंद्रपूर, 07 जानेवारी (हिं.स.)।व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या गावांमधील भटक्या कुत्र्यांनी वन्यप्राण्यांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्यांमुळे हरिण, ससा, मोर, कोल्हा आणि लहान पक्षी यांसारख्या प्रजातींचा मृत्यू झाला आहे. क
भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष मोहीम


चंद्रपूर, 07 जानेवारी (हिं.स.)।व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या गावांमधील भटक्या कुत्र्यांनी वन्यप्राण्यांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्यांमुळे हरिण, ससा, मोर, कोल्हा आणि लहान पक्षी यांसारख्या प्रजातींचा मृत्यू झाला आहे. काही प्रकरणांमध्ये, या हल्ल्यातून वाचलेल्या वन्यप्राण्यांना रेबीज व डिस्टेंपरसारख्या गंभीर आजारांची लागण झाल्याचेही आढळले आहे.

'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'ने (NTCA) सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या परिसरात कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरणासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ९५ गावे असून, प्रादेशिक वनविभागातील अनेक गावे या क्षेत्राला लागून आहेत. भटक्या कुत्र्यांपासून वन्यजीवांना असलेला धोका लक्षात घेता, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (चंद्रपूर), पीपल फॉर ॲनिमल्स (वर्धा) आणि वाइल्ड सीईआर (Wild CER) यांच्या संयुक्त विद्यमाने कुत्रे निर्बीजीकरण आणि लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

अशी आहे निर्बीजीकरण मोहिमेची कार्यपद्धती: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचे झोननुसार सर्वेक्षण करण्यात आले असून, ज्या गावांमध्ये कुत्र्यांची संख्या जास्त आहे आणि जिथे नागरिकांना त्रास होत आहे, अशा गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. सूर्योदयापासून जाळ्यांच्या साहाय्याने कुत्र्यांना पकडण्याचे काम सुरू होते. यावेळी त्यांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यानंतर त्यांना निर्बीजीकरण केंद्रात नेले जाते. तेथे तज्ज्ञ पशुवैद्यक त्यांची आरोग्य तपासणी करतात. गरोदर माद्या, पिल्लांना दूध पाजणाऱ्या माता, अत्यंत अशक्त किंवा आजारी कुत्री, सहा महिन्यांपेक्षा कमी वयाची पिल्ले आणि वृद्ध कुत्र्यांची शस्त्रक्रिया केली जात नाही. शस्त्रक्रियेपूर्वी कुत्र्यांना रेबीज नसल्याची खात्री केली जाते. केवळ निरोगी कुत्र्यांवरच शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेनंतर कुत्र्यांची योग्य देखभाल आणि औषधोपचार केले जातात. पूर्णपणे बरे झाल्यावर त्यांना ज्या ठिकाणाहून पकडले होते, त्याच ठिकाणी सोडून दिले जाते. सोडण्यापूर्वी सर्व कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जाते. तसेच डिस्टेंपर, डायरिया आणि उलट्यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी 'DHPPiL' लस दिली जाते. सध्या अनेक कुत्र्यांमध्ये त्वचेचे रोग आढळत असल्याने, त्यांच्यावर योग्य उपचार आणि जंतनिर्मूलनही केले जाते.

परिणाम: जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत पीपल फॉर ॲनिमल्स, वर्धा तर्फे १८८९ आणि 'वाइल्ड सीईआर' तर्फे ३८२ अशा एकूण २२७१ कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण झाले आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे व्याघ्र प्रकल्पाचे नियोजन आहे.

कुत्र्यांनी चावे घेण्याच्या घटना व रेबीजसारख्या आजारांचा प्रसार यामुळे भटके कुत्रे केवळ वन्यजीवांसाठीच नव्हे तर मानवी आरोग्यासाठीही चिंतेचा विषय आहेत. म्हणूनच भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण कार्यक्रम कायमस्वरूपी राबवला जाईल, जेणेकरून भविष्यात अशा समस्यांना प्रभावीपणे आळा बसेल.

प्रभू नाथ शुक्ला, क्षेत्र संचालक,ताडोबा

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande