
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। मुंबईच्या कुलाबा वॉर्ड क्रमांक २२६ येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप समोर आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विधानसभाध्याक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना उमेदवार तेजल पवार आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावल्याचा आरोप केला आहे. बुधवारी शिवसेना भवनात तेजल पवार आणि त्यांचे पती दीपक पवार यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या घटनांची माहिती दिली.
तेजल पवार यांनी सांगितले की, ३० डिसेंबर रोजी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पतीला कार्यालयात बोलावून घेतले आणि फोनवरून स्वतः तेजल पवार यांना निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले. आरोपानुसार, सुरुवातीला लाखो रुपयांची ऑफर देण्यात आली, त्यानंतर ती रक्कम कोट्यवधींपर्यंत वाढवण्यात आली. राहुल नार्वेकर यांचे पीए दोन दिवस सतत संपर्क करत होते, घरीही येऊन दार ठोठावले, मात्र त्यांनी दार न उघडल्याचे तेजल पवार यांनी म्हटले.
दीपक पवार यांनीही गंभीर आरोप करताना सांगितले की, राहुल नार्वेकर यांनी “निवडणूक का लढताय?” असा सवाल करत दबाव आणला आणि त्यांच्या पीएने जबरदस्ती कार्यालयात नेल्याचे सांगितले. “मी कुठल्या पदावर आहे ते तुला माहिती नाही का, मी बोलावल तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही येतात,” असे धमकीवजा शब्द वापरल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर “तुला कुलाब्यात राहायचे की नाही ते तू ठरव” अशी उघड धमकी देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.
या सर्व दबावामुळे ते घाबरले, फोन बंद करून घर सोडावे लागले आणि पक्षाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने शेवटी ते शिवसेना भवनात आले, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या आरोपांमुळे कुलाब्यातील निवडणूक अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule