
अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते . त्यांच्या या दौऱ्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अमरावतीत आगमनानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट माजी पालकमंत्री तसेच शिवसेनेचे पश्चिम विदर्भाचे माजी संघटन प्रमुख जगदीश गुप्ता यांच्या सिपना कॉलेज येथे भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.अलिकडेच पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करत जगदीश गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना सोडण्याची घोषणा केली होती. संघटनात्मक निर्णयांबाबत तसेच स्थानिक पातळीवरील दुर्लक्षामुळे आपण नाराज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का बसल्याचे मानले जात होते. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अमरावतीत येऊन गुप्ता यांची भेट घेणे, हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.शिंदे आणि गुप्ता यांच्यात सध्या बंददरवाजाआड चर्चा सुरू असून, या बैठकीतील नेमका अजेंडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, ही चर्चा समेटासाठी असून नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, या बैठकीदरम्यान कोणतेही माध्यम प्रतिनिधी उपस्थित नव्हते, त्यामुळे चर्चेतील मुद्द्यांबाबत गोपनीयता पाळली जात आहे.जगदीश गुप्ता हे विदर्भातील एक प्रभावशाली नेते मानले जातात. अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि संघटनात्मक अनुभव आहे. त्यांच्या निर्णयाचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर तसेच आगामी राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुप्ता पुन्हा शिवसेनेत परतणार का, की स्वतंत्र राजकीय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या भेटीमुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद मिटण्याची चिन्हे दिसत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नेत्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत मिळत आहेत. या चर्चेनंतर गुप्ता यांची पुढील भूमिका काय असेल, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता असून, अमरावतीसह संपूर्ण विदर्भाच्या राजकारणात याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी