
सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व वसुंधरा कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागृती निर्माण करणे, महिला व बालहक्कांबाबत जनजागृती करणे तसेच सायबर गुन्हयांपासून संरक्षणाबाबत मार्गदर्शन करणे हा होता.कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश प्रशांत पेठकर यांनी मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांचे कार्य ही वैचारिक क्रांती असल्याचे सांगितले. शिक्षित व सुज्ञ महिलांमुळे समाजात नैतिकतेचे संस्कार रुजतात आणि सामाजिक समतेचे वातावरण निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले. हक्क व अधिकारांचा वापर करताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून युवकांनी सतर्क राहून आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात अॅड. अनुराधा कदम यांनी मनोधैर्य योजनेबाबत मार्गदर्शन केले. पीडितांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत, संरक्षण व कायदेशीर आधार याविषयी त्यांनी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात सहायक लोकअभिरक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस स्कीम २०२४ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर क्राईम जागृती सत्रात श्रीमती अंजली काळे यांनी सोशल मीडियाच्या आमिषाला बळी पडून होणाऱ्या फसवणुकीबाबत सावध राहण्याचे आवाहन केले. सतर्कता आणि जागरुकताच सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड