
अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.)
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून राणा दाम्पत्य आक्रमक प्रचाराच्या मैदानात उतरले आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या आमदार सुलभा खोडके यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.नवनीत राणा यांनी जाहीर सभेत बोलताना आमदार सुलभा खोडके यांच्यावर थेट निशाणा साधला. “मी अमरावती शहरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरले नाही, याबद्दल त्यांनी माझे आभार मानले पाहिजेत. जर मी प्रचारात उतरले असते आणि केवळ दोन सभा घेतल्या असत्या, तर त्या दोन हजार मतांनीही निवडून आल्या नसत्या. उलट दहा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला असता असा दावा नवनीत राणा यांनी केला.यावेळी बोलताना नवनीत राणा अधिक आक्रमक झाल्या. मला इमानदारी शिकवण्याची आमदार सुलभा खोडके यांना काहीच गरज नाही. जनतेने कोणाला कशासाठी निवडून दिले आहे, हे सर्वांना माहिती आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार खोडके यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.तसेच विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत नवनीत राणा म्हणाल्या, “त्या निवडणुकीत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोसुद्धा चालला नाही. मोदींच्या नावावर मते मिळत नसतील, तर जनतेचा विश्वास कुठे आहे, हे त्यांनी आधी तपासावे याचवेळी “या भगव्यामध्ये त्यांचा पराभव करण्याची ताकद आहे,” असा जोरदार टोला त्यांनी लगावला.राणा दाम्पत्य सध्या अमरावतीत महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय असून सभांमधून आणि प्रचार दौर्यांतून विरोधकांवर थेट हल्ले चढवत आहेत. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे भाजप समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या गोटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.दरम्यान, नवनीत राणा यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अमरावतीच्या राजकारणात आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या अशा आक्रमक वक्तव्यांमुळे प्रचाराची रंगत वाढली असून, मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी