
नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)। नांदेड महानगरपालिकेची निवडणूक दिनांक 15 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. या निमित्ताने नांदेड शहरातील मतदार शोधताना उमेदवारांना अत्यंत अडचणी येत आहेत. एवढेच नव्हे तर मतदारांच्या शोधासाठी अनेक प्रयत्न करावे लागत आहेत.
नांदेड महानगरपालिकेच्या निवडणूक मैदानात उतरलेल्या उमेदवारांना प्रचारावेळी मतदार नक्की कुठे आहेत हा प्रश्न उमेदवारांना पडत आहे. कारण शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून मतदार इकडून तिकडे स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे घरांचे पत्ते शोधून काढत त्यांच्या गाठीभेटी घेताना उमेदवारांच्या तोंडाला फेस येत आहे. परिणामी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान आहे. त्यामुळे उमेदवारांच्या हाती आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक प्रभागात २० हजारांहून अधिक मतदान आहे. त्यामुळे सर्वच मतदारांपर्यंत पोहोचण्याचे दिव्य पार करणे अवघड होऊन बसले आहे.
मतदारांनी स्थलांतरण केले असले तरी, मतदान मात्र त्यांचे पूर्वीच्याच प्रभागात आहे अशा मतदारांची संख्या मोठी आहे. तर प्रभागरचनेतही फेरबदल झाल्यामुळे आपला प्रभाग नेमका कुठपर्यंत याचाही अंदाज लावताना कठीण जात आहे.
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतदान हे पाच जागा असलेल्या सिडको-वाघाळा प्रभागात आहे. या ठिकाणी ३१ हजार ९०८ मतदार आहेत, तर सर्वात कमी मतदान हनुमानगड येथे १९ हजार ३८० आहे. तर तरोडा खु. २६ हजार २०६, तरोडा बु.२७ हजार ९०४, सांगवी बु.२० हजार ३४२, भाग्यनगर २४ हजार ४५८, गणेशनगर २४ हजार २९६, जयभीनगर-मगदूमनगर २२ हजार ८७८, शिवाजीनगर २२ हजार ८२६, नवा मोंढा २१ हजार ६१३, दत्तनगर २४ हजार ३९६, हैदरबाग २५ हजार २४८, उमर कॉलनी ३० हजार १६२, चौफाळा-करबला २१ हजार ५६७, इतवारा-मदिनानगर २५ हजार ६८७, होळी-मनियारगल्ली २९ हजार ४३५, वजिराबाद-गाडीपूरा २४ हजार ९९६, गुरुद्वारा २३ हजार २८२, खडकपूरा-देगावचाळ २६ हजार ३९, वसरणी-कौठा प्रभागात २९ हजार १७६ मतदार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis