
अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.) ।महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळेच असे गंभीर गुन्हे घडत आहेत.” अकोला हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करावी आणि महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.सपकाळ म्हणाले की, अमरावती शहरात प्रशासक काळात लॅन्ड माफियांचा सुळसुळाट झाला असून, शहराची कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. गुन्हेगारी वाढली असून, सामान्य नागरिक असुरक्षित बनला आहे. विदर्भाच्या विकासावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “नागपूरचा विकास म्हणजे संपूर्ण विदर्भाचा विकास नव्हे. वस्तुस्थिती अशी आहे की, नागपूरचाही अपेक्षित विकास झालेला नाही. अमरावतीसह संपूर्ण विदर्भाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे.”निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडून पैसा फेक तमाशा सुरू आहे. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील खेळणं बनलं आहे. मतदानाच्या आधी आणि मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झाले.” मनपा निवडणुकांमध्येही असाच प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. “सत्ताधारी पक्ष महाराष्ट्राच्या लोकशाहीचा गळा घोटत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.राज्याच्या नेतृत्वावर टीका करताना सपकाळ यांनी दोनही उपमुख्यमंत्री गुंड असल्याचा आरोप केला. ईव्हीएम मशीनवर नोटा ठेवल्यामुळे बिनविरोध जागा होत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या अध्यक्षांवरही त्यांनी आरोप करत, “स्वतःचा भाऊ, भावजय आणि बहीण बिनविरोध निवडून यावेत यासाठी दबाव आणला जातो,” असे सांगितले.अंबरनाथच्या राजकारणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “अंबरनाथमध्ये काँग्रेसचे १२ उमेदवार निवडून आले असून, आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसचा भाजपशी कुठलाही संबंध नाही. भाजपला आम्ही पाठिंबा दिलेला नाही आणि देणारही नाही.” वंचित बहुजन आघाडीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुंबईमध्ये काँग्रेस-वंचित युती आहे. “वंचित हा आमचा मित्र पक्ष आहे. मित्र पक्षाने मित्र पक्षावर टीका करू नये,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रणिती शिंदे यांच्याबाबत वक्तव्य करू नये, असेही त्यांनी नमूद केले.भाजप-एमआयएम संबंधांवर टीका करत सपकाळ म्हणाले, “एमआयएम हे भाजपचे ‘बी टीम’ आहे, हे नांदेड निवडणुकीत सिद्ध झालं आहे.” पुढे ते म्हणाले, “भाजप मजबूत झाल्याचा कांगावा केला जातो, पण भाजप इतर पक्षांच्या उमेदवारांनाच तिकीट देत आहे.”समृद्धी महामार्गावर २ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. “महाराष्ट्रात टक्के घेतल्याशिवाय फाईल पुढे जात नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “ते ‘देवा भाऊ’ नाहीत, तर ‘घेवा भाऊ’ आहेत. त्यांची शॉर्ट टर्म मेमरी गेली असून, त्यांना गजनी झाला आहे.”“भाजप पैसे वाटून निवडणुका लढवत आहे, याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे,” असा निष्कर्ष काढत सपकाळ म्हणाले की, काँग्रेस-मुक्त भारताच्या नादात भाजपच आता काँग्रेस-युक्त होत चालली आहे. “शतप्रतिशत भाजपचा नारा देणारे आता मित्र पक्षांना बाजूला सारत आहेत,” असा आरोप देखील त्यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी