सोलापूर : एआयएमआयएमला विजयी करा – असदुद्दीन ओवेसी
सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.) : आगामी १५ जानेवारी रोजी सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी नागरिकांकडे आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत एआयएमआयएमच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय लिहावा
असदुद्दीन ओवेसी


सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.) :

आगामी १५ जानेवारी रोजी सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी नागरिकांकडे आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत एआयएमआयएमच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय लिहावा, असे आवाहन एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले.

सोलापुरातील पानगल प्रशालेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

ओवेसी म्हणाले, “सोलापूर शहर राज्याला दरवर्षी सुमारे ७०० कोटी रुपयांचा महसूल देते. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ४३३ कोटी आणि अमृत योजनेअंतर्गत १८५ कोटी रुपये मंजूर झाले असतानाही शहरात अपेक्षित विकासकामे का झाली नाहीत? हा निधी नेमका कुठे गेला, याचा जाब जनतेने राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे. जर प्रामाणिकपणे काम झाले असते, तर सोलापूर आज पुण्यापेक्षाही अधिक विकसित शहर ठरले असते. मात्र, विद्यमान राज्यकर्त्यांची तशी इच्छाशक्ती दिसून येत नाही.”

मुस्लिम मतांचे विभाजन करण्यासाठी जाणीवपूर्वक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुढे केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भाजप सत्तेत आल्यापासून देशात मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा करत ओवेसी म्हणाले, “सरकार ‘कायदा आपले काम करत आहे’ असे सांगून जबाबदारी टाळत आहे. आता राजनैतिक भाषा सोडून थेट सत्य बोलण्याची वेळ आली आहे.”

सोलापुरातून विधानसभेत आमदार आणि महाराष्ट्रातून लोकसभेत खासदार पाठवणे हे आपले स्वप्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande