
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.) : मुंबई–ठाणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, लोकल रेल्वेमधील प्रचंड गर्दी आणि प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ या समस्यांवर प्रभावी उपाय ठरणारी मेट्रो लाईन 4 आणि 4A अंतिम टप्प्यात पोहोचली असून 2026 पासून टप्प्याटप्प्याने सेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
वडाळा, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाण्यातील कासारवडवली, घोडबंदर रोड, गायमुख या संपूर्ण पट्ट्याला जोडणारी ही मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. सध्या या मार्गांवर रस्ते वाहतूक आणि लोकल रेल्वेवर मोठा ताण आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच प्रवाशांचा त्रासही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठाणे शहरात असून कॅडबरी जंक्शन ते गायमुख असा सुमारे 10.5 किलोमीटरचा मार्ग सर्वात आधी सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule