
रायगड, 07 जानेवारी (हिं.स.)। जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत ग्रामविकासाचा आदर्श घालून देणारा उपक्रम कारिवणे (ता. श्रीवर्धन) ग्रामपंचायतीने यशस्वीपणे राबविला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दिनांक ७ जानेवारी रोजी संपूर्ण रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी ‘वनराई बंधारा बांधणे’ ही विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला कारिवणे गावातून मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी व प्रेरणादायी ठरला.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले. सकाळपासून युवक, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक हातात कुदळ-फावडे घेऊन कामाला लागले. श्रमदानातून उभारलेले वनराई बंधारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी उपयुक्त ठरणार असून, त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाला गटविकास अधिकारी मा. माधव जाधव यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या एकजुटीची प्रशंसा केली. लोकसहभागातून राबविलेले असे उपक्रमच खऱ्या अर्थाने गावाच्या विकासाला चालना देतात, असे त्यांनी नमूद केले.या मोहिमेत माजी सभापती बाबुराव चोरगे, सरपंच गीता चोरगे, उपसरपंच बबन जोशी, कृषी अधिकारी सयाजी इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी अभिजित माने, कृषी सहाय्यक दत्तात्रय कुंभारकर यांच्यासह युवक मंडळ, महिला बचत गट व मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या मते, या वनराई बंधाऱ्यांमुळे भविष्यात शेतीला पाणी उपलब्ध होऊन उत्पादनात वाढ होईल तसेच गाव दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करेल. जनतेच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम केवळ शासकीय कार्यक्रम न राहता, खऱ्या अर्थाने जलसंधारणाची लोकचळवळ ठरल्याचे चित्र कारिवणे गावात पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके