
पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत पीएमपीमधील भाडेतत्वावरील बसच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय पीएमपीची प्रतिमा देखील मलिन झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने चालकांसाठी नवीन नियमावली लागू केली आहे.
पीएमपी प्रशासनाने बस चालकांसाठी नवीन नियमावली लागू करताना चालकांना विविध स्तरावर खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत काही उपाययोजना सुचविल्या आहेत.प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या निष्काळजी चालकांना पाठीशी घातले जाणार नाही. जर एखादा चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता बस चालविताना आढळला, तर संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. हे निर्देश महामंडळाचे चालक आणि सर्व ठेकेदारांच्या चालकांनाही लागू करण्यात आले आहेत.
अपघातांचे प्रमाण वाढले आहे. भाडेतत्वावरील बस चालकांना शिस्त लावणे आवश्यक झाले आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना प्रत्येक आठवड्याला चालकांचे प्रबोधन करण्याचे आदेश दिले आहेत. चालक निष्काळजीपणे बस चालविताना आढळला, तर त्याच्यासह ठेकेदारावर कडक कारवाई केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु