
पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)। पिंपरी चिंचवड प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम व मिळकतींच्या मालकी हक्क प्रमाणपत्राचे ( प्रॉपर्टी कार्ड) महापालिका निवडणुकीनंतर वाटप करण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले. याशिवाय शहरातील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग केले जाणार आहे. प्रत्येक प्लॉटवरील प्रत्येक घराचा सरकारी नकाशा गुगल क्लाऊडवर दिला जाणार आहे, ज्या माध्यमातून थेट आपल्या मोबाईलमध्ये आपल्या नकाशा दिसणार आहे. पाचशे वर्षानंतरही आपले घर आपल्याला गुगलवर दिसेल. ही सर्व प्रक्रिया मोफत केली जाणार आहे असे देखील बावनकुळे म्हणाले.
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने प्रभाग 17, 23 आणि 24 येथील उमेदवारांसाठी वाल्हेकरवाडी आणि थेरगाव येथे जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप उपस्थित होते. दरम्यान सभेसाठी प्रभाग 17 मधील आशा सूर्यवंशी, नामदेव ढोके, पल्लवी वाल्हेकर, सचिन चिंचवडे तर प्रभाग 23 मधील मनीषा प्रमोद पवार, तानाजी बारणे, सोनाली गाडे, अभिषेक बारणे आणि प्रभाग 24 मधील उमेदवार सिद्धेश्वर बारणे, करिष्मा बारणे, गणेश गुजर आणि शालिनी गुजर हे उमेदवार उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेमध्ये प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मी राज्यामध्ये तुकडा बंदी कायदा अंमलबजावणी केली . या कायद्यामुळे गुंठा, दीड गुंठा जागेमध्ये बांधलेल्या घरांची सरकार दरबारी नोंदणी करणे शक्य झाले. महापालिका निवडणुका झाल्यानंतर आपण आमदार शंकर जगताप यांनी मागणी केल्याप्रमाणे सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड करून घेणार आहोत. मी स्वतः या प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यासाठी शहरात येणार आहे. याशिवाय आपण येथील घरांचे ड्रोन मॅपिंग देखील करणार आहोत. येथील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग करून प्रत्येक प्लॉटचा सरकारी नकाशा आम्ही गुगल क्लाऊड वर देणार आहोत. ज्या माध्यमातून गुगलवर नाव टाकल्यानंतर घराचा नकाशा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. यातून एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज तयार होणार आहे. ज्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला होणार आहे. सरकार विशेष बाब म्हणून या सर्व घरांचे ड्रोन मॅपिंग करून नागरिकांना मोफत प्रॉपर्टी कार्ड देणार आहे. त्यामुळे यापुढील काळात तहसीलदाराकडे चकरा मारावे लागणार नाही. याचा लाखो परिवाराला दिलासा मिळणार आहे. हे निर्णय होण्यासाठी येत्या 15 जानेवारी रोजी भाजपला आपले मतदान महत्त्वाचे आहे. असे देखील बावनकुळे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु